यवतमाळ : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.८) दिवाळीच्या दिवशीच वणी तालुक्यातील चारगाव चौकी परिसरातील पेट्रोल पंपासमोर घडली. प्रज्योत रवींद्र बुच्चे (वय २७) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चारगाव चौक परिसरातील मालू पेट्रोल पंपावर प्रज्योतने दुचाकीत पेट्रोल टाकले. त्यानंतर तो चारगाव चौकीकडे परत येत होता. तेव्हा चारगाव चौकीकडून वणीच्या दिशेने जाणार्या ट्रक (एमएच ३४ बीझेड ९८०९) या ट्रकने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार प्रज्योत याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी मृताचे वडील रवींद्र बुच्चे (वय ५२) यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.