

कोडोली : वारणा साखर कारखान्यामध्ये ट्रॉलीतील ऊस खाली करून भरधाव वेगाने मांगले गावाकडे जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरवर ट्रॅक्टर आदळून बाबासाेा यशवंत मोहिते (वय ५६, रा. मांगले, ता. शिराळा) हे ट्रॅक्टरचालक रस्त्यावर जोरदार आपटल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कोडोली-वाठार रस्त्यावर घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री सहा वाजता मांगले गावातून ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीमधून ऊस भरून बाबासोा मोहिते वारणा साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यामध्ये आले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ट्रॉलीतील ऊस खाली करून मांगले गावी भरधाव जात असताना कोडोली-वाठार रस्त्यावरील विराज गॅस एजन्सीसमोर आले असता ट्रॅक्टरचालक मोहिते यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या डिव्हायडवर जोरात आदळून समोरील खड्ड्यामध्ये जाऊन कोसळला. यावेळी मोहिते हे रस्त्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने वारणा कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मोहिते यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.