यवतमाळ : कंटेनर व ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनाच्या चालकासह ट्रॅव्हल्स मधील आठ प्रवासी जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी महागाव तालुक्यातील कासोळा- पुसद रस्त्यावर घडली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना मदत केली.
ट्रॅव्हल्स चालक विनोद चव्हाण (३५, रा. मोहा, ता. पुसद) काळी दौलतखान येथून प्रवासी घेऊन मुंबईकडे निघालेली ट्रॅव्हल्स (एमएच-२९ बीई ३२३५) पुसदमार्गे प्रवास करत असताना कासोळा गावाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या कंटेनर (टीएस-०१ बीसी १७५३) ने ट्रॅव्हल्सला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.. चालकाचा पाय केबिनमध्ये अडकला होता, तर बाजूच्या सीटवर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले. परिसरातील आणि तत्काळ पुसद उपजिल्हा नागरिकांनी जखमींना बाहेर काढले.
रुग्णालयात उपचारासाठी हलविले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ महागाव-पुसद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेनंतर तब्बल दोन तासांनी पुसद ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.