Umarkhed Cattle Shed Fire
यवतमाळ : जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत चार गायी मृत्युमुखी पडल्या तर एक म्हैस व एक गाय ९० टक्के जळाली. गोठ्यात असलेला स्प्रिंकलर सेट, हळदीचे बियाणे, जनावरांचा चारा संपूर्ण जळून खाक झाला. यात शेतकर्याचे अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले. ही दुर्दैवी घटना रविवारी उमरखेड तालुक्यातील टाकळी (रा.) शेतशिवारात घडली.
तालुक्यातील टाकळी राजापूर या गावालगत प्रवीण पुंडलिक कदम यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा आहे. दुपारी अचानक आग लागल्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या सहा जनावरांपैकी चार गाई मृत्युमुखी पडल्या तर एक म्हैस व एक गाय 90 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रवीण कदम यांच्याकडे दोन एकर शेती असून शेतीपूरक उद्योग म्हणून त्यांच्याकडे पाच गाई व एक म्हैस होती. रविवारी त्यांच्या गोठ्याला दुपारी अचानक आग लागल्याने संपूर्ण गोठा जळून खाक झाला. जनावरांसोबतच गोठ्यात असलेले स्प्रिंकलर पाइपचा सेट, वीस क्विंटल हळदीचे बियाणे व जनावरांचा चारा संपूर्ण जळून खाक झाला. यात शेतकर्याचे अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
उन्हाची दाहकता जास्त असल्याने शेत शिवारात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आग लागल्यानंतर संपूर्ण गोठा जळून खाक झाल्यानंतर नागरिकांनी बाजूच्या शेतातील विहिरीतील पाण्याने आग विझविली. परंतु, तोपर्यंत शेतकर्याचे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. अल्पभूधारक असलेल्या शेतकर्याकडे उदरनिर्वाहासाठी जनावरांचा आधार होता.
परंतु, या आधीच संपूर्ण खाक झाल्याने तातडीने मदत मिळण्याची मागणी होत आहे. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी घटनास्थळाला भेट दिली.
आगीमध्ये शेतकर्याचा संसार उध्वस्त झाला असून नेमके आगीचे कारण समजू शकले नाही. परंतु, गोठ्यावरून विद्युत वाहिनी गेलेली असल्याने तसेच आज दुपारी सोसाट्याचा वारा असल्यामुळे विद्युत वाहिनीच स्पार्किंग होऊन आग लागल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.