यवतमाळ

School mid-day meal: उमरखेडातील शाळांतील मध्यान्ह भोजनावर संकट

Umarkhed schools: टेंडर प्रक्रियेतील विलंबाचा फटका; धान्याअभावी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था ठप्प

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : केंद्र व राज्य शासनाच्या मध्यान्ह भोजन (पीएम पोषण) योजनेच्या धान्य पुरवठ्यासाठीची टेंडर प्रक्रिया रखडल्याने उमरखेड तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ५९९ शाळांमधील विद्यार्थ्यांचा पोषण आहार बंद आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही शाळांमध्ये धान्याचा पुरवठा न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था विस्कळीत झाली असून पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळी सुटीपूर्वीच अनेक शाळांमधील धान्यसाठा संपला होता. याबाबत संबंधित शाळांनी ‘पीएम पोषण’ पोर्टलवर नोंदी करूनही प्रशासनाकडून वेळेत कार्यवाही झाली नाही. परिणामी, नवीन सत्र सुरू झाल्यानंतरही बहुतांश शाळांना धान्य उपलब्ध झालेले नाही.

धान्याअभावी काही ठिकाणी मध्यान्ह भोजन पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक स्वतःच्या खिशातून अथवा स्थानिक दुकानदारांकडून उधारीवर किराणा आणून विद्यार्थ्यांचे भोजन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही व्यवस्था किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यस्तरावर नवीन पुरवठादाराचा करार अद्याप पूर्ण न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तोपर्यंत स्थानिक स्तरावर उपलब्ध धान्याचा वापर करण्यास किंवा तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्या, तरी ग्रामीण व दुर्गम भागात त्याची अंमलबजावणी करणे कठीण ठरत आहे.

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय बेतेवाड यांनी, "विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व पोषणाचे नुकसान होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधून तात्पुरती व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असे सांगितले. दरम्यान, शासनाने टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून धान्याचा नियमित पुरवठा सुरू करावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या पोषण आहार योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात येईल, अशी मागणी शिक्षक, पालक व शिक्षण क्षेत्रातून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT