Umarkhed news  Pudhari File Photo
यवतमाळ

Umarkhed news : बाजारभावापेक्षा कमी दराचे आमिष; सिमेंट, पोलाद व साखरेत ३.६८ कोटींची फसवणूक

व्यापारी आणि शासकीय कंत्राटदारांच्या तक्रारीनुसार पोफाळी पोलिसांत 'आर. के. एंटरप्रायजेस'च्या संचालकाविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Cement steel sugar scam Umarkhed

उमरखेड, पुढारी वृत्तसेवाः बाजारभावापेक्षा कमी दरात सिमेंट, पोलाद व साखर पुरवण्याचे आमिष दाखवून व्यापारी आणि शासकीय कंत्राटदारांची तब्बल ३ कोटी ६८ लाख ८८ हजार १०१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर. के. एंटरप्रायजेस, पोफाळीचे संचालक रामेश्वर केशव कुऱ्हाडे (वय ३२, रा. तरोडा, ता. उमरखेड) याच्याविरुद्ध पोफाळी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) व ३१६(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोफाळी येथे सिमेंट, स्टील व साखरेच्या घाऊक विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वतः ओएनजीसीमध्ये ज्युनिअर असिस्टंट टेक्निशियन असल्याचे सांगत बाजारभावापेक्षा कमी दरात माल देण्याचे आश्वासन देऊन त्याने व्यापारी व कंत्राटदारांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला नियमित मालपुरवठा करून विश्वास संपादन केला. त्यानंतर २ मे २०२५ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत आरटीजीएस व ऑनलाइन व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम स्वीकारली. मात्र, त्यानंतर मालाचा पुरवठा न करता संबंधितांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

व्यापारी आणि शासकीय कंत्राटदारांच्या तक्रारी

या प्रकरणात किरण शामप्रसाद दीक्षित व गजानन आगाशे (उमरखेड), सतीश गुलाबराव भडंगे (फुलसावंगी), सर्वेश गजानन मुनगीलवार (वाई बाजार, ता. माहूर), शिवराज संजय जाधव व यशवंत कदम (हदगाव), फैजल हारून फाजलानी (सारखणी, ता. किनवट), तसेच शासकीय कंत्राटदार प्रदीप कनीराम जाधव व स्वप्नील रमेश पवार (पुसद) यांनी संयुक्त तक्रार दाखल केली आहे.

पोफाळी पोलिसांचे आवाहन

तक्रारदारांनी सादर केलेल्या बँक व्यवहारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे करीत आहेत. बाजारभावापेक्षा अत्यल्प दरात माल देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यापारी किंवा संस्थेची सखोल शहानिशा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT