Sugarcane Pudhari
यवतमाळ

Sugarcane Price Protest | ऊस दरासाठी विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांचा एल्गार: २७ नोव्हेंबरला पाच साखर कारखान्यांवर धडक

४२०० रुपये प्रतिटन दरासाठी २५ नोव्हेंबरपासून ऊसतोड बंद ठेवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Vidarbha Marathwada Farmers Protest

उमरखेड : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४२०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. ऊस उत्पादक संघर्ष समिती विदर्भ-मराठवाडाच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाच प्रमुख साखर कारखान्यांवर एकाच वेळी एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी २५ नोव्हेंबरपासून ऊसतोड बंद ठेवण्याचे आवाहनही समितीने केले आहे.

या आंदोलनात पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना, गुंज येथील नॅचरल शुगर, मंगरूळ येथील डेक्कन शुगर, हदगाव तालुक्यातील हडसणी येथील सुभाष शुगर आणि कळमनुरी तालुक्यातील शिऊर शुगर या पाच कारखान्यांवर हजारो ऊस उत्पादक शेतकरी धडक देणार आहेत. विशेषतः उमरखेड येथील वसंत सहकारी साखर कारखान्यावरील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे एकरी उत्पादन २० ते २५ टनांपर्यंत घसरले आहे. त्यातच वाढता उत्पादन खर्च आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत साखरेच्या दराच्या प्रमाणात ऊस उत्पादकांना प्रतिटन ४२०० रुपये दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.

समितीचे नियोजक तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चितंगराव कदम म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही ४२०० रुपये प्रतिटन दर मिळालाच पाहिजे. उत्पादनात मोठी घट झाल्याने योग्य दर मिळाला नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद होईल.

हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून सर्वपक्षीय शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे राजकीय आणि वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक ऊस उत्पादकाने आंदोलनात सहभागी व्हावे. प्रत्येक शेतकरी कुटुंबातून किमान एका प्रतिनिधीने उपस्थित राहावे, तसेच तालुकानिहाय बैठका घेऊन आंदोलनाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन समितीने केले आहे.

ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर तातडीने जाहीर करावा, जळीत उसावरील कपात पूर्णपणे बंद करावी आणि ऊस गाळपासाठी गेल्यानंतर आठ दिवसांच्या आत बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, या प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत.

चितंगराव कदम, नितीन येरावर, अनिल महाजन, गोपालसिंह गौर आणि माधवराव सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे नियोजन सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT