Umarkhed Bribery case pudhari photo
यवतमाळ

Umarkhed Bribery case : अंगणवाडी मदतनीस पदासाठी लाचेची मागणी; बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून देण्याचे आमिष दाखवत १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महागाव येथील अतिरिक्त कार्यभार असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय महिला तक्रारदाराने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. संबंधित पदावर निवड करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. पडताळणीदरम्यान आरोपीने तडजोडीअंती प्रथम हप्त्यापोटी पाच हजार रुपये व काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचला. तक्रारदाराला महागाव येथील आरोपीच्या निवासस्थानी पाठविण्यात आले. तेथे आरोपीने स्वयंपाकघरात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर आरोपीने ती रक्कम स्वयंपाकघरातील गॅस ओट्याखालील पहिल्या कप्प्यात ठेवली. यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेत कारवाई केली.

या प्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या राहत्या घराची झडतीही घेण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीचे पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक सीमेंद्र शिंदे यांच्या नियंत्रणाखाली, पोलिस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलिस निरीक्षक मनोज ओरोके तसेच पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT