Uddhav Thackeray Yavatmal Rally
यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : "आईची शपथ घेऊन तुम्ही गद्दारी करणारे आहात. माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले तरी हा ठाकरे तुमच्यासमोर खंबीरपणे उभा आहे," अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील जाहीर सभेतून शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
बंडखोर आमदारांवर सडकून टीका करताना ठाकरे म्हणाले, "माझ्या सांगण्यावरून तुम्ही रक्ताचे पाणी करून यांना निवडून दिले, पण त्या गद्दारांनी चाळीस आमदार फोडले आणि गद्दारी करून तोंडाला काळे फासले. पण माझी काळजी करू नका, सडलेली पाने गळून गेली आहेत आणि आता नवी पालवी (कोंब) फुटत आहे." यावेळी त्यांनी फुटीर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ देखील दाखवला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आईची शपथ घेत मी शिवसेना ठाकरेंसोबत राहणार असल्याचं सांगितलं होतं. संजय देशमुखांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली, आता त्या आईला काय वाटत असेल? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला.
"विकासनिधी काय फक्त भाजपच्या मालकीचा आहे का? ज्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले, ती जनता काय पाकिस्तानमधून आली आहे का?" मोदींच्या नावावर निवडून आलेल्या खासदारांची लोकसभेतील उपस्थिती किती होती, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, पासपोर्टला भारतीय ओळखपत्र न मानण्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरताना, "मग आता काय भाजपचे सदस्य पत्र ओळखपत्र म्हणून वापरायचे का?" असा खोचक सवाल त्यांनी केला. भाजपमधील अटलजी आणि अडवाणी यांनी कधी असा विचार केला असता का, याची आठवणही त्यांनी करून दिली.
"मला आता 'भाजपा मुक्त राम' पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत. खरे हिंदुत्व माणुसकी शिकवते," असे सांगत राम मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या निधीतील घोटाळा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना 'अन्नदाता' म्हणत त्यांच्याशी गद्दारी का केली जात आहे. "शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही, याचा जाब सरकारला विचारा," असे आवाहन करत "यांना बाबासाहेबांची घटना बदलायची आहे. निवडणुका नसताना हे सतत फोडाफोडीचे राजकारण करत आहेत, त्यामुळे आता आपली घोषणा 'अबकी बार तडीपार' हीच असली पाहिजे," असे ते म्हणाले.