यवतमाळ

Yavatmal Truck Accident | माहूर रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रक थेट किराणा दुकानात घुसला; अपघाताचा CCTV व्हिडीओ व्हायरल

Yavatmal Truck Accident | भरधाव ट्रक किराणा दुकानात घुसला; दुचाकींचा चक्काचूर! थरार सीसीटीव्हीत कैद.

पुढारी वृत्तसेवा

Yavatmal Truck Accident

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील पुसद-माहूर रोडवर गुंज बस स्टॉपजवळ एक भीषण अपघात झाला. माहूरकडून पुसदकडे भरधाव वेगाने येणारा सिमेंटने भरलेला ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या एका किराणा दुकानात शिरला. या भीषण अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे.

चालकाला झोप लागल्याने अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक चंद्रपूरहून सिमेंट घेऊन येत होता. मात्र, वाहन चालकाला झोपेची डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. सुदैवाने, या अपघाताच्या वेळी एका व्यक्तीने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला.

माहूर मार्गावर गतिरोधकांची मागणी

या अपघातामुळे स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुंज येथील हा मार्ग श्री रेणुका देवी आणि दत्तशिखर माहूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे नेहमीच गजबजलेला असतो. या मार्गावर मोठी वर्दळ असूनही गुंज परिसरात दिशादर्शक फलक आणि गतिरोधकांचा अभाव आहे.

या धोकादायक ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ते गतिरोधक आणि चेतावणी फलक बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT