leopard attack Pudhari file photo
यवतमाळ

Leopard Attack | सातघरी शिवारात बिबट्याचा हल्ला; दोन शेतकरी आणि शेतमजूर महिला गंभीर जखमी

Leopard Attack | यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सातघरी शिवारात सोमवारी सकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Leopard Attack |

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सातघरी शिवारात सोमवारी सकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करत असताना दोन शेतकरी आणि एका शेतमजूर महिलेला बिबट्याने अचानक झडप घालत गंभीर जखमी केले. या वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे सातघरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागावर रोष व्यक्त केला जात आहे.

घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे बबन मारुती घाडवे आणि प्रकाश घाडवे अशी आहेत. दोघे शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. बचाव करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या हातापायांवर खोल जखमा झाल्या. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.

यापूर्वीही याच परिसरात बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना नोंदवली गेली आहे. काही दिवसांपूर्वी लिलाबाई नरसिंग चव्हाण या शेतमजूर महिलेला बिबट्याने गंभीर जखमी केले होते. त्या घटनेनंतर शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली होती, मात्र बिबट्याचा वावर सतत वाढत असल्याने धोका पूर्णपणे टळलेला नाही.

सातघरी आणि आसपासच्या भागात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाकडे पूर्वीपासून आहे. काळी दौलत वनपरिक्षेत्र हद्दीत बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांत बिबट्याचे स्पष्ट चित्रणही कैद झाले आहे. तरीही आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकरी व ग्रामस्थ नाराज आहेत.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “वारंवार हल्ले होत आहेत, लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरीही बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून कोणतीही प्रभावी पावले उचलली जात नाहीत.” परिसरात भीतीचे वातावरण असल्याने अनेक शेतकरी आता गटाने शेतात जाण्याचा निर्णय घेत आहेत.

वन विभागाकडून बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, प्रत्यक्षात काहीही दिसत नसल्याने ग्रामस्थ वन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. बिबट्याच्या सततच्या हालचालीमुळे सातघरी व आसपासच्या गावांमध्ये भीती पसरली असून नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने शोधमोहीम, पिंजरा उभारणी आणि बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या घरातील स्त्रिया, वृद्ध आणि बालकांनाही बाहेर फिरताना भीती वाटत असल्याने या भागातील दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. बिबट्याच्या हल्ल्याची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने शासनाने आणि वन विभागाने तातडीने पावले उचलून बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडून वनक्षेत्रात हलवावे, अशी मागणी सातघरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT