यवतमाळ : खूनासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मोस्ट वाँटेड गँगस्टरला यवतमाळ पोलिसांनी शनिवारी (दि.३१) मोठ्या शिताफीने अटक केली. भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा असे अटक केलेल्या गँगस्टरचे नाव आहे. पंजाब आणि राजस्थान येथे त्याच्यावर खूनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे राजस्थान पोलिसांनी त्याच्यावर २५ हजारांचे बक्षिस जाहीर केले होते. त्यामुळे स्वतःची ओळख लपवून तो दोन वर्षांपासून यवतमाळ शहरात वास्तव्यास होता.
पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि.३१)शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविण्यात येत होती. यावेळी पंजाब राज्यातील होशियारपूर येथील भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा हा खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी यवतमाळ शहरातील जांब रोड परिसरात स्वतःची ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शोध घेतला असता दांडेकर ले-आउटमधील एका घरी भाड्याच्या घरात राहत असल्याची खात्री झाली. त्यानुसार या घराची माहिती काढून पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांची याची चाहूल लागताच तो पळून जात असताना मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपणच भूपेंद्र सिंग असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हा कुख्यात गैगंस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगमधला गुंड असून पंजाब आणि राजस्थानमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अॅक्ट अशा अनेक प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. वाहनेर येथील हरपालसिंग उर्फ रिंकू (रा. गंगानगर वाडनेर) याचा खून करून तो यवतमाळमध्ये आला होता. अखेर पोलिसांनी त्याच्या यवतमाळमध्ये मुसक्या आवळत त्याला राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले.