Mahagaon taluka house fire
यवतमाळ : महागाव तालुक्यातील मुडाणा येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून लाखो रुपयांचे सजावट व घरगुती साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र आग तब्बल दोन तास धगधगत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.
अविनाश उत्तमराव चेडके असे नुकसानग्रस्ताचे नाव आहे. त्यांचा सजावटीचा व्यवसाय आहे. त्यामुळे घरात सजावटीची विविध फुले, बलून व इतर साहित्य होते. अविनाश चेडके हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर, पत्नी शेतात गेली होती. मुलगी एकटीच घरी होती.
दरम्यान त्यांच्या घराजवळून गेलेल्या ३३ केव्हीच्या वीज वितरण कंपनीच्या लाइनवर अचानक शॉर्टसर्किट झाले. त्याची धग चेडके यांच्या घरापर्यंत पोहोचली. ही आग इतकी भीषण होती की, घराच्या काचा फुटल्या. आगीचा प्रकार लक्षात येताच मुलीने घराबाहेर पळ काढला. यावेळी गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
महागाव येथे अग्निशामक केंद्र असूनही वाहन उशिरा पोहोचल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. उमरखेड येथून अग्निशामक वाहन येण्यासाठी सुमारे दोन तासांचा वेळ लागला. अखेर गावातील युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत घरातील लाखो रुपयांचे सजावट साहित्य, कपडे, रोकड, सोन्याचे दागिने व इतर वस्तू जळून खाक झाल्या. तहसीलदार अभय मस्के, पोलिस अधिकारी, आदींनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून नुकसानभरपाई दिली जाईल, असे सांगितले.