यवतमाळ : नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकला पाठलाग करून वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले. या ट्रकमधून २४ गोवंशांची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास करण्यात आली. ट्रकचा टायर फुटल्यानंतरही जवळपास ७० किमीपर्यंत चालकाने राष्ट्रीय मार्गावर बेकायदेशीरपणे ट्रक पळविला. दरम्यान पोलिस आणि गोरक्षक पाठलाग करीत असल्याने तस्करांनी वडकी येथील पुलावर ट्रक उभा करीत अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
याबाबत अधिक माहिती अशी, नागपूर येथून एका ट्रकमध्ये अवैधरित्या जनावरांना कोंबून कत्तलीसाठी घेवून जाण्यात येत होते. याबाबतची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यावरून गोरक्षक आणि पोलिस प्रशासनाने त्या ट्रकचा बुट्टीबूरीपासून पाठलाग केला. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक आणखी भरधाव वेगाने पळविला. अशातच त्या ट्रकचा मागील टायर फुटला, मात्र १४ चाकी ट्रक असल्याने चालकाने ट्रक न थांबवताच डिक्सवर जवळपास ७० किलो मीटरपर्यंत पळवितच नेला. दरम्यान याबाबतची माहिती वडकी पोलिसांना मिळाली असता पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचल्याचे ट्रक चालकाला लक्षात येताच त्याने ट्रक सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. याप्रकरणी २४ गोवंशाची सुटका करीत ट्रकसह २४ लाख ८० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत वडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी ठाणेदार सुखदेव भोरकडे, निलेश वाढाई, विनोद नागरगोजे, निलेश निमकर, आकाश कुदुसे यांनी केली.
जनावर तस्करी करणारे वाहन वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेवून वडकी उड्डाणपूल येथे नाकाबंदी करण्यात आली. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी अज्ञात तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.