Yavatmal heat stroke death
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पांढरकवडा तालुक्यातील चिखलदरा (पो.) या गावात सात वर्षीय बालिकेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत बालिकेचे नाव सोनाश्री विठ्ठल भूरकुटे असे असून ती चिखलदरा (पो.) येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी ती घरासमोर उन्हात खेळत होती. त्या दरम्यान अचानक तिची तब्येत बिघडली आणि ती जागीच कोसळली. गावकऱ्यांनी तातडीने तिला नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तिला मृत घोषित केले. सोनाश्रीच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची माहिती गावातील पोलीस पाटलांनी दिली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात सध्या तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी नागरिक यांना विशेषतः दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तसेच आवश्यक असल्यास डोक्यावर ओला कपडा वापरणे, पुरेशी विश्रांती घेणे व शरीरातील पाण्याची कमतरता होऊ न देणे यासाठी योग्य ती काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी लहान मुलांबाबत अधिक दक्षता बाळगण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करताना काळजीपूर्वक वर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.