

यवतमाळ : लग्नाचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील मुलताई येथील एका तरूणाने ३० वर्षीय तरूणीवर अत्याचार केला. आशिष राजपूत (वय २८) असे संशयित तरूणाचे नाव आहे. त्याने घर बांधकाम, चारचाकी वाहन खरेदीसाठी वेळोवेळी मुलीसह तिच्या वडिलांकडून ८ लाख ५ हजार रुपयांची घेत फसवणूकही केली आहे. ही बाब लक्षात येताच पिडीत तरुणीने अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
आशिष वीरसिंग राजपूत, रजनी राजपूत, अजित राजपूत, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३० वर्षीय मुलीची मध्य प्रदेशातील मुलताई येथील आशिष राजपूत (वय २८) याच्यासोबत २०१९ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली. आतेभाऊ मुकेश रघुवंशी याच्या ओळखीतील असल्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये चांगलीच मैत्री जमली होती. यानंतर त्या मुलीने स्वतःच्या आई-वडिलांसोबत त्याची भेट करून दिली. रेल्वेमध्ये नोकरी आणि एकाच जातीचे असल्यामुळे आशिषसोबत लग्न लावून देण्याचा निर्णय दोघांच्याही कुटुंबीयांनी घेतला. चार वर्षाच्या कार्यकाळात प्रेमसंबंध वाढले. २१ एप्रिल २०२१ मध्ये तरुणीच्या घरी कुणीही नसल्याचे पाहून आशिषने तिचे घर गाठून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तरुणीच्या आई-वडिलांनी लग्नाबाबत विचारणा केली असता, आर्थिक परिस्थिती खराब असून, दोन वर्ष लग्न करणार नाही, असे सांगितले.
सोबतच मुलताई येथे घर बांधकाम चालू असल्याचे सांगून २०२० ते २०२१ या कार्यकाळात तरुणीच्या वडिलांकडून वेळोवेळी स्वतःच्या बँक खात्यावर चार लाख रुपये मागून घेतले. त्याचप्रमाणे अत्याचारग्रस्त तरुणी नोकरीवर असल्यामुळे तिच्याकडून २०२३ ते २०२४ या काळात घरबांधकाम, चारचाकी वाहनाकरिता चार लाख २५ हजार रुपये घेतले. दरम्यान, २५ फेब्रुवारी २०२५ मध्ये आशिष याने मध्य प्रेदशातील अब्दुलगंज मंडीदीप येथील मुलीसोबत सोयरीक केली. याबाबत मुलासह त्याची आई रजनी राजपूत यांनाही संपर्क साधला. परंतु त्यांनीसुद्धा मुलाचे लग्न लावून देण्यास नकार देत पैसेसुद्धा देणार नाही, असे सांगितले. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या मुलीने अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आशिष वीरसिंग राजपूत (वय २८), आई रजनी (वय ५८) तसेच भाऊ अजित (वय २६), (सर्व रा. मुलताई, मध्यप्रदेश) या तिघांविरोधात गुन्हे नोंद केले.