Kinwat Pregnant Tigress Death
उमरखेड : किनवट तालुक्यातील मदनापूर परिसरात रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या गर्भवती वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण १५ दिवस उलटूनही स्पष्ट झालेले नाही. १७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून सावरी येथे वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अद्याप शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर वन्यजीवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मृत वाघीण गर्भवती असल्याची पुष्टी वनविभागाने यापूर्वीच केली होती. नव्या अधिवासात तिच्यामुळे वाघांची संख्या वाढण्याची अपेक्षा असतानाच ही दुर्घटना घडल्याने वन्यजीवप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. वाघिणीचा मृत्यू रेल्वेच्या धडकेमुळेच झाला की त्यामागे अन्य काही कारण होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विदर्भ वन्यजीव विभाग आणि मराठवाड्यातील प्रादेशिक वनविभाग यांच्यातील हद्द व समन्वयाच्या प्रश्नामुळे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर बोधडी वनपरिक्षेत्र आणि पैनगंगा अभयारण्य प्रशासनाने शवविच्छेदन अहवालाची सद्यस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अहवाल प्राप्त झाला असल्यास तो तातडीने सार्वजनिक करावा आणि अद्याप प्राप्त झाला नसल्यास विलंबाची कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने समन्वयाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. रेल्वेमार्गावरील वन्यजीवांच्या वावराची संवेदनशील ठिकाणे निश्चित करणे, त्या परिसरात गस्त वाढविणे आणि आवश्यक ठिकाणी रेल्वेच्या वेगावर मर्यादा आणणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
दरम्यान, गर्भवती वाघिणीचा मृत्यू हा केवळ एका वन्यप्राण्याचा मृत्यू नसून जैवविविधतेच्या दृष्टीनेही मोठे नुकसान आहे. या प्रकरणात कोणाची निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.