यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या दोन महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या जनजागृती रथाचा शुभारंभ आज (दि.९) जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. (Yavatmal News)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पांडे आदी उपस्थित होते.
तलावांमध्ये साठलेला गाळ काढून शेतात पसरविल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. हा गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरु केली. या सोबतच नाला खोलीकरण व रुंदीकरण ही योजना देखील राबविण्यात येत आहे. दोन्ही योजना आता कायमस्वरूप राबविल्या जात आहे.
गाळमुक्त धरण योजनेद्वारे गाळ काढण्यासाठी यंत्रसामुग्री व इंधनाचा खर्च शासनाच्यावतीने केला जातो. तलावातून काढलेला सुपीक गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियास अनुदान दिले जाते. अनुदानाच्या लाभासाठी एक हेक्टर क्षमतेपर्यंत सीमांत, अल्पभूधारक व एक ते दोन हेक्टरपर्यंतचे लहान शेतकरी पात्र आहे. विधवा व अपंग शेतकरी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय अधिक जमीन धारण करीत असले तरी पात्र आहेत.
जिल्ह्यात या दोन्ही योजनेच्या जनजागृतीसाठी विशेष चित्ररथ काढण्यात आला आहे. सलग 15 दिवस हा चित्ररथ जवळजवळ जिल्ह्यातील 200 गावांमध्ये योजनेचे महत्व समजावून सांगण्यासोबतच मृद व जलसंधारणाचा जागर करणार आहे. चित्ररथास हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रथ पुढे रवाना झाला.