संतोष लहाने
सराटी ः छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हायवे रस्त्यावरील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी-गोळेगाव मार्गालगत अवघ्या पन्नास फूट अंतरावर कठडाविना उघड्या पडलेल्या विहिरी सध्या मृत्यूला निमंत्रण देत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. झाडाझुडपांनी वेढलेल्या या अरुंद व खोल विहिरी अपघातासाठी अक्षरशः सापळे ठरत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.
मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात 9 जणांचा कारसह विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच, अशाच प्रकारची दुर्घटना येथेही घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांची सततची वर्दळ असलेल्या या मार्गावर सुरक्षा उपायांचा पूर्ण अभाव असल्याने धोका अधिकच वाढला आहे.
पानस फाट्याजवळ हॉटेल महालक्ष्मी समोरच हायवेच्या कडेला असलेली विहीर, त्याचप्रमाणे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हॉटेल रॉयल बार अँड रेस्टॉरंट, राम हॉटेल शेजारील विहीर, सराटी ड्ढ खंडाळा फाट्याजवळील आणखी एक विहीर, या सर्व ठिकाणी कोणतेही कठडे किंवा इशारा फलक नसल्याने प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
याच मार्गावर 15 वर्षापूर्वी 23 जून 2011 मध्ये निल्लोड ड्ढ आळंद परिसरात बनकीन्होळा या गावाच्या हद्दीत एसटी बस सिल्लोड हून छत्रपती संभाजीनगर कडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुच्या विहिरीत कोसळून 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. तरीही प्रशासनाने यापासून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, ही बाब अधिक चिंताजनक आहे.
प्रशासनाचा पुढाकार गरजेचा
आगीतून फुफाट्यात अशी स्थिती निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबंधित शेतकऱ्यांना पर्यायी विहिरींची सोय करून देणे, आवश्यक त्या ठिकाणी मजबूत कठडे उभारणे, इशारा फलक लावणे आणि आर्थिक मोबदला देत शेतकरी हितही जपणे ्र या सर्व बाबींची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे.अन्यथा, अपघात झाल्यावरच शहाणपण येते ही म्हण पुन्हा खरी ठरण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.