विदर्भ

यवतमाळ: जिल्ह्यालात पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दोनजण वाहून गेले

अमृता चौगुले

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सोमवारी २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७०.३ मिमी पाऊस झाला. सर्वाधिक ११५.२ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरले असून पिकेही पाण्यात गेली आहे. याशिवाय दोनजण पुरात वाहून गेले आहेत.

पांढरकवडा तालुक्यातील दहेली तांडा येथील भारत पुरूषोत्तम राठोड (वय१३) वर्षे हा मुलगा गावालगतच्या नाल्यावर दुपारी  गेला असता तो परत आला नाही. दरम्‍यान तो शेतालगत नाल्यात मृत अवस्थेते दिसुन आला. याशिवाय सोनबर्डी येथील बंडु राघोजी कोहचाडे (वय ५५) हा व्यक्ती सायंकाळी ५:३० दरम्यान शेतामधून घरी परत येत होता. पुलावर पाणी वाहत असल्याने पाण्यातुन येण्याचा प्रयत्न केला. त्याचा तोल गेल्याने ताे पुरात वाहुन गेला. आज सोमवारी सकाळी शोध घेत असता त्याचा मृतदेह आकोली शेत शिवारामध्ये नाल्यात आढळून आला.

यंदा जून महिन्यातच जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यानंतर जुलै-ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंतही अधूनमधून सुरूच होता. सोमवारी सकाळपर्यंत यवतमाळ तालुक्यात ५७.७, बाभूळगाव ७८.५, कळंब ६५.६, दारव्हा ९९.९, दिग्रस ५६.४, आर्णी ११५.२, नेर ८५.५, पुसद २६.७, उमरखेड ५६.८, महागाव ५९.१, वणी ९०.६, मारेगाव ५७.१, झरी जामणी ७९.३, केळापूर ८४.६, घाटंजी ७६.२ आणि राळेगाव तालुक्यात ५६.९ मिमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब

जिल्ह्यातील पूस, अरुणावती, गोकी, वाघाडी, सायखेडा आणि बोरगाव हे सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. तर अडाण प्रकल्पात ८८.५५, अधरपूस ८७.२५ आणि बेंबळा प्रकल्पात ७८.४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT