विदर्भ

नागपूर: अनिल देशमुख यांचे जल्लोषात स्वागत

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख २१ महिन्यांनंतर स्वगृही नागपुरात परतले. फुलांनी सजविलेल्या जीपमधून त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारले. गुलालाची उधळण, ढोलताशांच्या गजरात, कार्यकर्त्यांनी जल्लोषात जंगी स्वागत केले. चार जेसीबीच्या सहाय्याने निवासस्थानी आल्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली.

या वेळी अनिल देशमुख म्हणाले की, " २१ महिन्यानंतर मी माझ्या गावात, नागपुरात परतलो याचा मला अतिशय आनंद आहे. मला खोट्या गुन्ह्यात फसविण्यात आले होते. येथे स्वागतासाठी मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते पाहून मला फार आनंद होत आहे. माझा मुलगा सलील हा कायम मतदारसंघात लोकांच्या संपर्कात होता."

देशमुख यांचे दुपारी चार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर वर्धा रोडवरील साई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. व्हेरायटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण, आदिवासी गोवारी समाज चौक येथे स्मारकाला भेट, संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व मानवंदना दिल्यानंतर रॅलीचा समारोप देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी झाला.

रॅली दरम्यान चौका-चौकात स्वागत मंच उभारले गेले. लाडू वितरण, पुष्पवृष्टी व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. बँड व ढोल ताश्‍यांच्या गजरात ठिकठिकाणी अनिल देशमुखांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. संघर्ष योद्धा, साहेब तुम्ही डगमगले नाहीत, आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवले,…असे अनेक फलक जागोजागी लागले होते.

याप्रसंगी एका पत्रकाचे देखील वाटप करण्यात आले. यामध्‍ये देशमुखांवरील आरोपांपासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा दिलासापर्यंतचा घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, प्रवीण कुंटे-पाटील, ज्येष्ठ नेते शेखर सावरबांधे, आभा पांडे, रमण ठवकर, नूतन रेवतकर, जानबा मस्के, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, संतोष सिंह, शैलेंद्र तिवारी, आशिष लाड आदीसह काटोल, नरखेड परिसरातून आलेले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT