वाशीम; पुढारी वृतसेवा : लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठल्याही राज्यकर्त्यांला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र माजी गृहराज्यमंत्री तथा पदवीधर आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्याकडून लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवून लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. अशी टीका इसा संघटनेचे सचिव श्याम प्रजापती यांनी मंगळवारी (ता. २२) वाशीम येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. रणजित पाटील यांच्याकडून पोलीस व शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी श्याम प्रजापती म्हणाले की, आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी त्यांच्या बारा वर्षांच्या काळात कुठलेही ठोस काम केले नाही. पाच जिल्ह्यांमधील पदवीधरांचा त्यांच्याविरोधात रोष आहे. ८ नोव्हेंबर रोजी आमदार पाटील यांनी बारा वर्षात केलेल्या कामांची माहिती मागितली होती. पण त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे युवकांनी १५ नोव्हेंबर रोजी आमदार रणजीत पाटील यांच्या अकोला येथील निवासस्थानासमोर जवाब दो आंदोलन केले होते. तेव्हा देशभक्तीपर गीत गायन व पथनाट्य सुरू असताना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. लोकशाही मार्गाने पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदवीधरांना अशाप्रकारे पोलिसांकडून दमदाटी करणे, निवेदन देण्यापासून अटकाव करणे, ही बाब लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवणारी आहे, असा आरोप शाम प्रजापती यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला इसा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बारंगे, हरिश्चंद्र प्रसाद आदी उपस्थित होते.
हेही वाचा :