Wife Brutally Murdered by Her Own Husband in the Middle of the Street
वाशिम : पुढारी वृत्तसेवा संशय हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. “संशयाने केला संसार उध्वस्त” ही फक्त ओळ नाही, तर अनेक कुटुंबांची खरी कहाणी आहे. विश्वासावर उभा असलेला संसार जर संशयाच्या सावलीत गेला, तर प्रेम, आपुलकी भावना आणि समजूतदारपणा हळूहळू नष्ट होऊ लागतात.
लहान-लहान गोष्टींवरून सुरू झालेला संशय वाद निर्माण करतो, वादातून दुरावा वाढतो आणि शेवटी नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. असाचं एक प्रकार आज मालेगाव येथे पाहवयास मिळाला. आपल्या अर्धांगिनीवर संशय घेऊन एका पतीने आपल्याचं पत्नीचा धारदार शास्त्राने भर दिवसा मुख्य रस्त्याच्या मधोमध खुन केला.
सविस्तर घटना अशी की, जिल्ह्यातील मालेगाव शहरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची भर रस्त्यात दि,२७ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजे दरम्यान हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल वाघ वय 40 हा कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असायचा. तो अधूनमधून मालेगाव येथील आपल्या घरी येत होता. मात्र प्रत्येक वेळी पत्नी पुष्पा वाघ (वय 35) यांच्यासोबत चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात तीव्र वाद होत असल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी दि,२७ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजे दरम्यान दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात विठ्ठल वाघ यांनी धारदार शस्त्राने पत्नीवर वार केले. जीव वाचवण्यासाठी पुष्पा वाघ घराबाहेर पळाल्या, परंतु आरोपीने त्यांचा पाठलाग करत उघड्या जागेत भर रस्त्यात निर्दयपणे तिची हत्या केली. ही घटना भर रस्त्यात घडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी विठ्ठल वाघ याला तात्काळ अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजेश खेरडे हे करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वाघ कुटुंब पूर्णत उद्ध्वस्त झाले आहे. संशयाच्या भावनेने एका कुटुंबाचा संसार संपुष्टात आला असून त्यांच्या दोन लहान मुलांवर मोठे संकट ओढवले आहे. आईच्या मायेपासून वंचित झालेली ही मुले आणि वडिलांवरही कारावासाचे संकट असल्याने त्यांचे भविष्य अनिश्चित बनले आहे.