Suspicious Death Washim
वाशिम : कामनिमित्त मित्रांसोबत वाशिम येथे आलेल्या ३४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. १०) पहाटे उघडकीस आली. आशिष बाबाराव शेळके (रा. एकलारा, ता. आर्वी, जि. वर्धा) असे मृताचे नाव आहे. घातपात की अपघात, यावरून तर्कवितर्क लावले जात असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शेळके हा त्याचा मित्र विनोद वसंतराव फटिंग (रा. सेलू, जि. वर्धा), अजय मनोहरराव वानखेडे (रा. धानोली, जि. वर्धा), गणेश जनार्दन भगत (रा. धानोली, जि. वर्धा) आणि सचिन शंकरराव राऊत (रा. सेलू, जि. वर्धा) यांच्यासह वाशिम शहरातील एका ले-आऊटच्या कामासाठी आले होते. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर, हे पाचही जण मंगळवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील शिवाजी चौक परिसरातील ‘हॉटेल अलख लॉजिंग’मध्ये मुक्कामी आले होते.
प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलवर पोहोचले तेव्हा हे सर्वजण नशेत होते. त्यांनी हॉटेलमधील कॉमन डॉर्मेट्रीमध्ये मुक्काम केला. मात्र, बुधवारी पहाटे जेव्हा अन्य मित्रांना जाग आली, तेव्हा आशिष बेडवर दिसून आला नाही. त्याचा शोध घेतला असता, हॉटेलला लागून असलेल्या इमारतीच्या परिसरात तो मृतावस्थेत आढळून आला.
रात्री एकत्र झोपलेले असताना आशिष पहाटे उठून टेरेसवर कसा गेला आणि तिथून तो खाली कसा पडला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हा अपघात आहे की घातपात, हे गूढ कायम आहे. वाशिम शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत.