Ladki Bahin Yojana Installment Issuse
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्याने गेली दोन दिवसांपासून जिल्ह्यातील महिलांचा संताप अनावर झाला आहे . हप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातून दर दिवशी आलेल्या असंख्य महिलांनी आज (दि. 20) वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्याचा आरोप महिलांनी केला आहे. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रवेश न मिळाल्याने महिलांचा रोष वाढत गेला.
यावेळी संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. “हप्ता द्या, अन्याय थांबवा”, “लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे” अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, हप्ता तातडीने न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.