Woman Arrested Washim
वाशिम : वाशिम जिल्ह्यात भर दिवसा दुकानात चोरी करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोमवारी (दि.23) फिर्यादी सुरेखा शालीक लिबोंळे या मानोरा येथील ‘चुन्नु मुन्नु’ कापड दुकानात खरेदीसाठी गेल्या असताना एका महिलेने त्यांच्या जवळ येत पर्समधील 44 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरी केला. या प्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आरोपी महिला गर्दीच्या ठिकाणी आपल्या लहान मुलाचा वापर करून नागरिकांचे लक्ष विचलित करत चोरी करत असल्याचे तपासात समोर आले. अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान संशयित महिला वाशीमकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने वाशीम शहरात शोधमोहीम राबवली.
सिव्हील लाईन परिसरात संशयित महिला आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने मानोरा येथील चोरीची कबुली दिली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंगझडती घेतली असता तिच्याकडून 44 हजार रुपये रोख रक्कम व चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव रोहिनी उर्फ शितल भास्कर शिंदे (वय 25, रा. नालंदा नगर, वाशीम) असे असून पुढील तपासासाठी तिला मानोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिच्याकडून इतर गुन्ह्यांबाबतही चौकशी सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, उपनिरीक्षक योगेश धोत्रे आणि त्यांच्या पथकाने केली.