स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कारवाई करत तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले  Pudhari
वाशिम

Washim Crime | वाशिम जिल्ह्यात तीन वाहनचोरीचे गुन्हे उघड : तीन आरोपी जेरबंद; ५.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, आणखी आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

Washim Vehicle Theft Case

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कारवाई करत तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

धनज पोलिस ठाण्यात २५ जुलै रोजी सुभाष भाऊराव निघोट (रा. रामनगर, कामरगाव, ता. कारंजा) यांनी त्यांच्या घरासमोर उभी असलेली फोर्स कंपनीची 'कुझर' चारचाकी (एमएच ३७ जी ७६२२) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

जिल्ह्यातील वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी दोन विशेष पथके तयार करून नांदेड व बुलढाणा येथे रवाना केली.

नांदेडमधील भाग्यनगर परिसरातून शेख अफजल ऊर्फ गोलू शेख दाऊद (वय २५, रा. धाड, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने नितीन रमेश गवई (वय २६) आणि शेख सरवर शेख मनवर (वय ३८, दोघेही रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांच्या साथीने कामरगाव येथून वाहन चोरी केल्याची कबुली दिली. चोरीची फोर्स कुझर कार नांदेडमधील तीन अनोळखी व्यक्तींना ८० हजार रुपयांना विकल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून वाहन विक्रीतून मिळालेली ८० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

दुसऱ्या पथकाने नितीन गवई आणि शेख सरवर यांना वाशिम-हिंगोली मार्गावरील तोंडगाव टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी धनज येथील वाहनचोरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी दोन वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार आणि टूल किट असा सुमारे ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत आतापर्यंत एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चोरीची वाहने खरेदी करणाऱ्या तसेच इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, शेखर मास्कर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT