वाशिम : तालुक्यातील ग्राम गोंडेगाव येथे ग्रामपंचायतच्या उघड्या नाल्यात पडून मृत्युमुखी पडलेल्या ३ वर्षीय स्वराजच्या दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी व सर्व संबंधीतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तसेच पिडीतांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे व जिल्हा सचिव तथा वाहतुक सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना शुक्रवारी (दि.१९) निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, वाशिम तालुक्यातील मौजे गोंडेगाव येथे गुरूवारी (दि.१८) सकाळी ९.३० च्या दरम्यान स्वराज्य अशोक खिल्लारे हा मुलगा खेळता खेळता नाल्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. हा नाला ग्रामपंचायतच्या मालकीचा असून हा नाला बांधून एक वर्ष पुर्ण झाले आहे. तरीही या नाल्यावर धापे बांधण्यात आलेले नाहीत. याबरोबरच काही नाल्यावर अर्धवट धापे बांधण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या पावसामुळे हा नाला तुडुंब भरला होता. या नाल्यावर धापे नसल्याने खेळता खेळता या नाल्यात पडून स्वराजचा मृत्यू झाला. बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली असून दोषी असलेले सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच मृत स्वराजच्या आईवडीलांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मृत स्वराजच्या परिवाराला न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.