Washim Violence News
वाशिम : शहरातील पाटनी चौकात रात्री किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या वादात झाले. दि. 12 मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजता दोन व्यक्तींमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर अफवा पसरल्या आणि दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण झाला. रात्री उशिरा काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली.
या घटनेबाबत पत्रकार परिषदे मध्ये माहिती देताना वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुज तारे म्हणाले, काल दुपारी १२ वाजता पाटनी चौकात एका व्यक्तीने दुसऱ्याला किरकोळ वादात मारहाण केली. त्यानंतर समाजात काही अफवा पसरल्या आणि दोन्ही गट आमनेसामने आले. पोलिसांना याची पूर्वकल्पना होती आणि वेळेवर घटनास्थळी पोहोचून जमाव पांगवण्यात आला.
आत्तापर्यंत २० ते २५ आरोपींची ओळख पटली असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेकीच्या व्हिडिओंच्या आधारे आणखी आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.शहरात अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिला.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.