soybean crop  pudhari photo
वाशिम

Washim News: वाशिम-मंगरूळनाथमध्ये पावसाअभावी सोयाबीन, तुर, मुग, उडीद पिके संकटात

वाशिम-मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात मागील सुमारे तीस दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : वाशिम-मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात मागील सुमारे तीस दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. विशेषतः सोयाबीन पिकाला सध्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना पावसाचा खंड पडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सावरगाव बर्डे, तामसी व पंचाळा फाटा परिसरातील शेतांमध्ये आमदार श्याम खोडे व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.

पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांची वाढ खुंटत असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला तरी पिकांना अपेक्षित वाढ व उत्पादन मिळणे कठीण असल्याचे शेतकऱ्यांनी पाहणीदरम्यान सांगितले. त्यामुळे सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून मतदारसंघातील परिस्थिती दुष्काळसदृश आहे की नाही, याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने हा पाहणी दौरा करण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांनी पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनातील घट याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तिची नोंद घेण्यात आली.

दरम्यान, पावसाचा दीर्घ खंड कायम राहिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता, पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व तहसीलदार निलेश पळसकर यांच्यासह भाजप शहराध्यक्ष मनीष मंत्री, विनोद पाटील जाधव, सुभाष नानवटे, दत्ताभाऊ गोटे, तालुकाध्यक्ष एकनाथ कडपाटील, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष रवींद्र ठाकरे, जगदीश देशमुख, गोपाल परांडे, पांडुरंग कोठाळे, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस गोपाल गोटे, दत्तराव गोटे, मोहन गोरे, गजानन कव्हर, माधव कड, माधव कव्हर तसेच ग्रामीण परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा अहवाल शासनस्तरावर सादर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT