वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मोहीम हाती घेतली  Pudhari
वाशिम

Washim Zilla Parishad | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर वाशिम जिल्हा परिषद प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 बाबत गावागावात जनजागृती मोहीम

पुढारी वृत्तसेवा

Solid Waste Management Rules 2026

वाशिम : स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना संयुक्त पत्राद्वारे आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विविध गावांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष पाहणी व जनजागृती सुरू झाली आहे.

याच अनुषंगाने बुधवारी वाशिम तालुक्याचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तोंडगाव, आडोळी आणि तामसी या गावांना भेट देत स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सुरू असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नाडेप खत खड्डे, कचरा विलगीकरण केंद्र तसेच गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतींना उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे, ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित करणे तसेच त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे राम श्रृंगारे, तोंडगावच्या सरपंच वंदना भगवानराव गोटे, उपसरपंच श्री गोटे, ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश भांडारकर, आडोळीचे उपसरपंच भगवान इढोळे, परमेश्वर इढोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सतिश इढोळे व दीपक इढोळे, ग्रामपंचायत अधिकारी अरविंद पडघन, तामसीचे अमोल कवर, ग्रामपंचायत अधिकारी लिंबाजी लांडगे तसेच गट समन्वयक वसंता इंगोले उपस्थित होते.

जनजागृतीसाठी पोस्टर आणि माहिती पुस्तिकांचा वापर

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष पोस्टर आणि माहिती पुस्तिकांचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, नाडेप खत खड्ड्यांचा उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी उपलब्ध सुविधांचा नियमित वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील 21 बाजारपेठेच्या गावांवर विशेष लक्ष

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 21 बाजारपेठेच्या ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्यात आले आहे. यात वाशिम तालुक्यातील काटा, तामसी, तोंडगाव, अनसिंग; मालेगाव तालुक्यातील मुंगळा, किन्ही राजा, शिरपूर, मेडशी; रिसोड तालुक्यातील वाकद, रिठद, हराळ, केनवड; मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा, शेलूबाजार; कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, पोहा, धामणी खडी, धनज बुद्रुक, कामरगाव तसेच मानोरा तालुक्यातील पोहरादेवी आणि शेंदुर्जना आढाव या गावांचा समावेश आहे.

ग्रामीण भाग अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ग्रामपंचायतींसह नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT