Samruddhi Expressway Vehicle Attack  Pudhari
वाशिम

Samruddhi Mahamarg Stone Pelting | समृद्धी महामार्गावर अज्ञातांकडून ८ ते १० वाहनांवर दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

वनोजा गावाजवळील घटना; महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प, पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

Samruddhi Expressway Vehicle Attack

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २७) रात्री घडली. वनोजा गावाजवळ टोल क्रमांक २०८ पासून कारंजाच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला. रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास झालेल्या या दगडफेकीत तब्बल आठ ते दहा वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे.

महामार्गावरून वाहने वेगाने जात असताना अचानक अज्ञातांकडून दगडफेक सुरू झाली. या अनपेक्षित प्रकारामुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक वाहनधारकांनी आपली वाहने महामार्गावरच थांबवली. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा ते एक तास विस्कळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली. मात्र, वाहनांवर दगडफेक करणारे अज्ञात व्यक्ती कोण होते आणि त्यांनी हा प्रकार का केला, याबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा सखोल तपास करून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT