जितेंद्र रा. मनोहर  Pudhari
वाशिम

Risod Accounts Officer Suspended | रिसोड पंचायत समितीचे सहायक लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर निलंबित

वाशीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई, खातेचौकशीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Risod Panchayat Samiti Assistant Accounts Officer Suspended

वाशीम : रिसोड पंचायत समिती येथील सहायक लेखा अधिकारी जितेंद्र रा. मनोहर यांना कर्तव्यात कसूर आणि वरिष्ठ आदेशांचे पालन न केल्याच्या ठपक्यावरून निलंबित करण्यात आले आहे. वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ च्या नियम ३ चा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे तसेच कार्यालयात अनधिकृत गैरहजर राहणे, असे तीन प्रमुख आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

निलंबन कालावधीत मनोहर यांचे मुख्यालय पंचायत समिती वाशीम राहील. या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील. मात्र, निलंबन काळात ते खासगी नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत, याची खातरजमा करून प्रमाणपत्र घेतल्यानंतरच निर्वाह भत्ता अदा करावा, असे निर्देश वाशीम पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अन्यथा निर्वाह भत्ता व इतर देय रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, रिसोड पंचायत समितीतील सहायक लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार तेथील कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच निलंबित अधिकारी मनोहर यांची खातेचौकशी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT