Risod Illegal Moneylending
वाशिम : रिसोड तालुक्यात सुरू असलेल्या अवैध सावकारी व्यवहारांविरोधात सहकार विभागाने कडक पावले उचलत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत झाडाझडतीची कारवाई केली. सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या दोन तक्रारींच्या अनुषंगाने कलम १६ नुसार ही कार्यवाही करण्यात आली.
दि. ९ जानेवारी २०२६ रोजी अब्दुल रऊफ शेख चांद (रा. बाल समंदर, चांदनी चौक, रिसोड) आणि भगबान तुकाराम गुडधे (रा. नागझरी–गोंदाळा, ता. रिसोड) यांच्या राहत्या घरांवर सहकार व पोलिस विभागाच्या दोन स्वतंत्र पथकांनी झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून संबंधित प्रकरणी सावकारी कायद्यान्वये अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.
या मोहिमेत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड गजानन फाटे यांच्यासह विविध तालुक्यांतील सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी, लिपिक व कर्मचारी तसेच पोलिस व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात प्रभावी नियंत्रण व कठोर कारवाईसाठी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम तसेच संबंधित तालुक्यांतील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात. तक्रारदाराचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड गजानन फाटे यांनी दिली आहे.