वाशिम

Washim Shiv Sena UBT news | 'ऑपरेशन टायगर'नंतर ठाकरे गट आक्रमक! खासदार संजय देशमुखांविरोधात शिवसैनिकांचा संताप

निष्ठावंत शिवसैनिक पक्षासोबत ठाम उभे आहेत; आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशीम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दि. 18 जून रोजी स्थानिक पाटणी चौक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले. पक्षाशी निष्ठा राखण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांनी खासदारफुटीच्या चर्चेचा निषेध नोंदविला.

अलीकडील काही दिवसांत ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, त्यामध्ये खासदार संजय देशमुख यांचे नावही चर्चेत आहे. पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षफोडीच्या राजकारणाचा निषेध केला. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात जनआक्रोश निर्माण होईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेमुळे वातावरण तापले असून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

"निष्ठावंत शिवसैनिक पक्षासोबत ठाम उभे आहेत. खासदारफुटीचे राजकारण जनतेला मान्य नसून अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध करण्यात येत आहे," अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT