

Shiv Sena UBT Crisis Deepens: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांदरम्यान आता आमदारांच्या संभाव्य फुटीचीही चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
राजकीय वर्तुळात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटातील लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र पक्षाच्या नऊ खासदारांपैकी केवळ चार खासदार उपस्थित राहिल्याची चर्चा आहे. त्यानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी अधिकच उघड झाल्याचे मानले जात आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदार वेगळा गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देऊ शकतात. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकसभा गटात विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य बंडखोरांमध्ये परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि मुंबई उत्तर-पूर्वचे संजय पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ काही मोजके खासदार उरल्याची चर्चा आहे. दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यचे अनिल देसाई आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे हे ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
जर सहा खासदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतला, तर तो लोकसभा गटातील दोन-तृतीयांश आकडा पूर्ण करू शकतो. त्यामुळे पक्षांतरबंदी विरोधी कायद्यांतर्गत कारवाई टाळण्याचा मार्ग त्यांच्यासाठी खुला होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
दरम्यान, पक्षातील परिस्थिती हाताळण्यासाठी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे. खासदारांशी थेट संवाद साधून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी सोशल मीडियावर काही खासदारांना पक्षांतरासाठी आर्थिक आमिष दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मात्र या कथित 'ऑपरेशन टायगर'चा फटका केवळ खासदारांपुरता मर्यादित राहणार नसल्याचीही चर्चा आहे. शिंदे गटातील एका मंत्र्याने दावा केला आहे की ठाकरे गटातील काही आमदारही संपर्कात आहेत. सध्या पक्षाकडे असलेल्या सुमारे 20 आमदारांपैकी 16 ते 17 आमदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरू शकतो.
राजकीय विश्लेषकांच्या मते, 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर ही दुसरी मोठी संघटनात्मक फुट असेल. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले होते. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पक्षातील खासदार आणि आमदारांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याची चर्चा आहे.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते सावध भूमिका घेत आहेत. "आम्ही कुणालाही पक्षात येण्याचे आवाहन करत नाही. पण शिवसेना (यूबीटी)मधील नाराज नेते आणि कार्यकर्ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे," अशी भूमिका शिंदे गटाकडून मांडली जात आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाकडून मात्र भाजपवर थेट आरोप केले जात आहेत. पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या सर्व घडामोडींच्या मागे भाजप असल्याचा दावा करत मतदारांच्या विश्वासाशी गद्दारी करू नये, असे आवाहन संभाव्य बंडखोर खासदारांना केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना आता ठाकरे गटातील संभाव्य खासदार आणि आमदार फुटीच्या चर्चांमुळे राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.