वाशिम: पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्हा पोलीस दलाने कसोशीचे प्रयत्न करून १ कोटी १५ लाखांची बॅग हिसकावून नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्हयाचा तपास २४ तासांच्या आत लावून गुन्हा उघडकीस आणला. या कौतुकास्पद कार्याची दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी वाशीम पोलीस दलाचे (Washim Police) कौतुक करून त्यांना ७० हजारांचे बक्षीस जाहीर केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, पोलिस निरीक्षक प्रदिप परदेसी, शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिह ठाकूर यांच्यासह सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. (Washim Police)
विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस हे बँकेसह एकाकडून १ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीवरून हिंगोली रोड जात असताना दोघां चोरट्यांनी त्यांना उड्डाणपुलावर अडवून मारहाण केली. व ही भलीमोठी रक्कम घेऊन पसार झाले. ही घटना गुरूवारी (दि.९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने या चोरीचा छडा लावत दोघां संशयितांना २४ तासाच्या आत गजाआड केले. विजय दत्तराव गोटे व संजय दत्तराव गोटे (रा तोंडगांव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. (Washim Police)