

वाशिम : विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस हे बँकेसह एकाकडून १ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीवरून हिंगोली रोड जात असताना दोघां चोरट्यांनी त्यांना उड्डाणपुलावर अडवून मारहाण केली. व ही भलीमोठी रक्कम घेऊन पसार झाले. ही घटना गुरूवारी (दि.९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने या चोरीचा छडा लावत दोघां संशयितांना २४ तासाच्या आत गजाआड केले. विजय दत्तराव गोटे व संजय दत्तराव गोटे (रा तोंडगांव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, भावेश बाहेती यांनी त्यांच्या विश्वासातील विठ्ठल हजारे यांना वाशिम येथील बँकेचा चेक देवून १ कोटी रुपये बँकतून व १५ लाख रुपये मित्राकडून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस हे १ कोटी १५ लाख रुपये घेवून दुचाकीवरून हिंगोली रोडकडे निघाले होते. यादरम्यान ते हिंगोली रोडच्या उड्डान पुलावर आले असता मागून येणाऱ्या दोघां चोरट्यांनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. व १ कोटी १५ लाख रुपये असणारी बॅग घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी विठ्ठल हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाशिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर वाशिम पोलिसांनी तपासाला गती देत सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे विजय गोटे व संजय गोटे या दोघांना ताब्यात घेण्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ कोटी ०२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.