Mukhyamantri Gram Samruddhi Abhiyan
वाशिम : मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत जांभरून (परांडे) येथील सरपंच सागर गोविंदा मोहळे यांनी जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पुनर्तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीनुसार, सन २०२५-२६ च्या मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत अभियानात जांभरून (परांडे) ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. तालुका स्तरावरील तपासणीत ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. मात्र, काही तक्रारींनंतर करण्यात आलेल्या फेरतपासणीनंतर क्रमवारीत बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरपंच सागर मोहळे यांनी निवड प्रक्रियेदरम्यान दबावतंत्राचा वापर झाल्याचा तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे पात्र ग्रामपंचायतीवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. विविध निकषांमध्ये समाधानकारक गुण मिळूनही अंतिम निवडीत जांभरून (परांडे) ग्रामपंचायतीला डावलण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत अभियानाची निवड प्रक्रिया पुन्हा पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी सरपंच मोहळे यांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत अभियानाच्या निवड प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवड प्रक्रिया स्थगित करून पुनर्तपासणी करण्यात आली नाही, तर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांसह आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, अमरावती विभागीय आयुक्त, खासदार देशमुख, आमदार श्याम खोडे आणि आमदार भावना गवळी यांनाही देण्यात आल्या आहेत.