Mahadiscom Employees Ban On Leaving Headquarters
वाशिम : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या तांत्रिक यंत्रणेला ‘हायअलर्ट’ दिला आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपले मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
यंदा जूनपासून राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट नोंदविण्यात आली असून, अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेती पिकांवरही झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महावितरणनेही राज्यभरातील तांत्रिक यंत्रणा सतर्क केली आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार संचालक धनंजय औंढेकर (संचालन), योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालकांनी विविध परिमंडलांना तातडीने भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक तांत्रिक कामे, वीजयंत्रणेची पाहणी आणि उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
दुष्काळाच्या काळात शेतीसह सर्वच ग्राहकांसाठी वीजपुरवठा सुरळीत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांतील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करून अथवा तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामात हलगर्जीपणा किंवा हयगय करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे.