Washim Illegal Cattle Transport
वाशिम : जिल्ह्यात अवैधरित्या गौवंशाची वाहतूक करणाऱ्यांविरोधात वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. कळंबा महाली परिसरात केलेल्या या कारवाईत २३ बैलवर्गीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी एक आयशर ट्रक आणि दोन बोलेरो पिकअप अशी तीन वाहने जप्त केली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३४ लाख रुपये आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गौवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ३० ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील कळंबा महाली परिसरातून गौवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी तीन वाहनांमधून २३ बैलवर्गीय जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत एक आयशर व दोन बोलेरो पिकअप वाहने असा सुमारे ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणातील आरोपी इलीयास खान बशीर खान (वय ५२, रा. काजीपुरा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) याच्यासह अन्य पाच आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले तसेच पोलीस कर्मचारी राहुल व्यवहारे, विनोद अवगडे, दिलीप देवकते, राजकुमार यादव, भुषण ठाकरे, विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.