

वाशीम : जिल्ह्यातील कारंजा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लष्करातील एका जवानाने आपल्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या केल्याचे समोर आहे. पोलिसांनी या प्रकरणी जवान आणि त्याच्या आई-वडिलांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील रहिवासी आणि भारतीय लष्कराच्या सहाव्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेला २८ वर्षीय जवान ज्ञानेश्वर मडणे याने आपली पत्नी दिपाली हिची हत्या केली. दिपाली सात महिन्यांची गरोदर होती. या घटनेनंतर कारंजा शहर पोलिसांनी आरोपी जवान आणि त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.
मृत महिलेचा भाऊ राहुल माने याने कारंजा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आरोपी सैनिकाचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि तो दिपालीचा सतत छळ करत होता, असा आरोप भावाने केला आहे. काही महिन्यांपूर्वी या वादावरून दोन्ही कुटुंबांची बैठक झाली होती आणि तडजोड करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी जवानाने फोन करून दिपाली घरी पडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. मात्र, मध्य प्रदेशातील बुरहानपूरहून कारंजा येथे पोहोचलेल्या कुटुंबीयांना या प्रकाराबाबत संशय आला. सध्या कारंजा शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत आहेत.
कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मनीष ठाकरे यांनी सांगितले की, ‘काल दुपारी कारंजा उपजिल्हा रुग्णालयातून दिपाली मडणे यांना मृत अवस्थेत आणल्याचा मेमो पोलिसांना मिळाला. त्यानंतर ड्युटी ऑफिसर तात्काळ रुग्णालयात पोहोचले. मृतदेहाची पाहणी केली असता हे प्रकरण संशयास्पद वाटले. कारंजा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि मी स्वतः घटनास्थळी भेट दिली. दिपालीच्या मानेवरील खुणा पाहून सुरुवातीलाच हत्येचा संशय बळावला. त्यानंतर मृताच्या भावाच्या तक्रारीवरून भारतीय लष्करातील जवानासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.’