Washim pickpocketing case Pudhari
वाशिम

Washim Crime | खिसे कापणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Washim pickpocketing case

वाशिम : शहरात गर्दीच्या ठिकाणी खिसे कापूगिरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हा बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ तसेच जत्रा-उत्सवांमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकिटे आणि रोख रक्कम चोरी करत होता.

या प्रकरणी ९ जानेवारी २०२६ रोजी रामदास तुकाराम सर्जेराव (रा. पिंपळशेंडा, ता. मालेगाव) यांनी तक्रार दाखल केली होती. ते मालेगावहून वाशिमकडे बसने येत असताना अकोला नाका परिसरात त्यांच्या खिशातून २८ हजार ६०० रुपये चोरीस गेले होते. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटविण्यात आली. मात्र आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

दरम्यान, शुक्रवारी (दि. १) आरोपी पुन्हा वाशिममध्ये चोरीच्या उद्देशाने आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अकोला नाका परिसरातून त्याला ताब्यात घेतले. आरोपीने आपले नाव राजकुमार उर्फ साधू कडू डोडे (वय ३३, रा. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे सांगितले.

चौकशीत आरोपीने वाशिममधील चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ९,५०० रुपये रोख, विविध कंपन्यांचे १३ मोबाईल (अंदाजे किंमत १ लाख ९५ हजार रुपये), ३ ग्रॅम सोने व १६ तोळे चांदी (अंदाजे किंमत ९५ हजार रुपये) असा एकूण २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने नांदेड, भुसावळ आणि वाशिम येथेही मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी आणि त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT