Women's Protest Washim
वाशिम : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजने अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने वाशिम जिल्ह्यातील शेकडो महिलांचा संताप आज (दि.१९) उफाळून आला. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही हप्ता जमा न झाल्यामुळे संतप्त महिलांनी थेट वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले.
“ई-केवायसी करूनही लाभ मिळत नसेल तर ही योजना नेमकी कोणासाठी?” असा सवाल उपस्थित करत महिलांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. “सर्वच लाडक्या ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा” अशा तीव्र घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
आंदोलनादरम्यान अनेक महिलांनी घरगुती आर्थिक अडचणी मांडत सांगितले की, या योजनेच्या हप्त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा मासिक खर्च काही अंशी अवलंबून आहे. मात्र वारंवार कार्यालयांचे फेरे मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, परिस्थिती चिघळू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधला. तांत्रिक अडचणी, प्रलंबित प्रकरणे व लाभ वितरणातील अडथळ्यांची माहिती देत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
तरीही ठोस कालमर्यादा न दिल्यामुळे महिलांमध्ये नाराजी कायम असून, हप्ता तात्काळ जमा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.