Washim Jai Gajanan Market License Cancelled
वाशिम : वाशिम-हिंगोली महामार्गावरील पंचाका परिसरात असलेल्या सारडा यांच्या जय गजानन खाजगी कृषी बाजाराचा परवाना राज्याचे पणन संचालक शरद जरे यांनी रद्द केला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियमातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. परवाना रद्द झाल्यानंतर संबंधित बाजाराने या परवान्याच्या आधारे शेतमालाची खरेदी-विक्री, लिलाव अथवा अन्य कोणताही बाजार व्यवहार करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
हिवरा-रोहिला येथील शेतकरी अभिषेक प्रदीपराव देशमुख यांनी ३० ऑक्टोबर २०२३ रोजी जय गजानन खाजगी कृषी बाजाराच्या कामकाजाबाबत पणन संचालकांकडे तक्रार केली होती. वजनकाट्यांची अचूकता, शेतमाल खरेदी-विक्रीतील पारदर्शकता, बाजारभावाचे प्रदर्शन, पावती व्यवस्था, बाजार शुल्क, देखरेख शुल्क, वैधानिक अहवाल, ऑनलाइन व्यवहार, परवाना अटींचे पालन आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आदी बाबींवर त्यांनी आक्षेप नोंदविले होते.
तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. चौकशीदरम्यान संबंधित कागदपत्रे, व्यवहार नोंदी, वजनकाट्यांशी संबंधित अभिलेख, परवाना अटी आणि इतर बाबींची तपासणी करण्यात आली.
पणन संचालकांच्या निष्कर्षानुसार, बाजारातील ६० टन क्षमतेच्या वजनकाट्यात वैधमापनशास्त्र विभागाच्या तपासणीत गंभीर तफावत आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. तसेच २०२३-२४ मधील नोंदींच्या तपासणीत सोयाबीनची काही खरेदी शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (एमएसपी) कमी दराने झाल्याचे निदर्शनास आले.
याशिवाय वैधानिक अहवाल सादरीकरण, देखरेख शुल्काचा वेळेत भरणा, चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे आणि बाजाराच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी राखून ठेवणे यासंदर्भातही त्रुटी आढळल्याचे आदेशात नमूद आहे.
या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून शेतकरी हिताच्या दृष्टीने जय गजानन खाजगी कृषी बाजाराचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, तक्रारदार शेतकरी अभिषेक देशमुख यांच्या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.