Washim HSC exam news file photo
वाशिम

HSC Exam: बारावीच्या फिजिक्स पेपरला 'सामुदायिक कॉपी'; ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे एकसारखीच; वाशिममधील धक्कादायक प्रकार

Washim HSC exam news: राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच वाशिम जिल्ह्यातून कॉपीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मोहन कारंडे

Washim HSC exam news

वाशिम : राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच वाशिम जिल्ह्यातून कॉपीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (क्रमांक ०९०६), टो-जुमडाफाटा येथे बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सामुदायिक कॉपी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाच्या अचानक भेटीत तसेच तपासणीत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले.

नेमका प्रकार काय?

१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास भरारी पथकाने या केंद्राला अचानक भेट दिली. केंद्रावर एकूण ५८४ विद्यार्थ्यांची नोंदणी असून ५८१ विद्यार्थी हजर होते. पथकाने जेव्हा उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी केली, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले. उपस्थित सर्व ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः सारखीच होती. जणू काही सर्वांनी एकाच स्रोतातून उत्तरपत्रिका 'कॉपी' केली होती. काही उत्तरपत्रिकांवर तर वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पेन आणि पेन्सिलने विशिष्ट खुणाही आढळल्या आहेत.

केंद्रावरील गैरसोयींचा डोंगर

तपासणीदरम्यान या परीक्षा केंद्रावरील विदारक स्थिती समोर आली आहे. अत्यंत दाटीवाटीची बसण्याची व्यवस्था, टिनशेडमध्ये परीक्षा, अपुरी प्रकाशयोजना, पंखे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, तसेच वीज खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण केंद्रात केवळ ८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते.

मोबाईल जप्त; अधिकाऱ्यांची धडक भेट

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनीही परीक्षा केंद्रास भेट दिली होती. भरारी पथकाच्या तपासादरम्यान एक कर्मचारी मोबाईल फोन घेऊन परीक्षा केंद्रात फिरत असल्याचे आढळले. मोबाईल तपासणीस टाळाटाळ केल्यानंतर अखेर दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

कारवाईचा बडगा उगारणार!

बैठे पथकातील सदस्यांनीही आपल्या अहवालात उपस्थित ५८१ विद्यार्थ्यांनी सामुदायिक कॉपी केली आहे, असे नमूद केले आहे. भरारी पथकाचा अहवाल, उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि संबंधित कर्मचाऱ्याकडे आढळलेले मोबाईल यावरून केंद्र क्रमांक ०९०६ येथे सामुदायिक कॉपी झाल्याचे स्पष्ट होत असून, या प्रकरणी शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन व गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT