Washim Nephew Kills Uncle
वाशीम : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन पुतण्याने काकावर कुर्हाडीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना वाशीम शहरातील गवळीपुरा परिसरात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय काकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अशोक जाधव असे मृत व्यक्तीचे नाव असून, हल्ल्यानंतर त्यांचा पुतण्या रवी जाधव फरार झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गवळीपुरा परिसरात राहणारे अशोक जाधव यांचा पुतण्या रवी जाधव याच्यासोबत सोमवारी (दि. २८) किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी रवी याने कुर्हाड उचलून अशोक जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
कुर्हाडीच्या हल्ल्यात अशोक जाधव गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वाशीम शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी रवी जाधव घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
हत्येमागील नेमके कारण, काका-पुतण्यामध्ये झालेल्या वादाचे स्वरूप आणि हल्ल्याच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे गवळीपुरा परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.