वाशीम - मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे हिवरा बु. येथील पशुपालक शेतकरी अक्षय गजानन चंदनकार यांच्या गोठ्यातून शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडलीय. अज्ञात चोरट्यांनी 12 बोकुडसह 5 बकऱ्या असे एकूण 17 बकऱ्या अंदाजे किंमत 1 लाख 59 हजार रुपयाचे चोरून नेल्या. ही घटना दि. 9 सप्टेंबर रोजी मध्य रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी फिर्यादी पशुपालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सकाळी गोठा उघडला असता शेळ्या दिसत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास पुन्हा सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये खळबळ माजली आहे. चोरीच्या घटनेचा अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहे.