Washim Jewellery Theft: बस प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २.२५ लाखांची सोन्याची चेन जप्त
Jewellery Theft
Jewellery Theft(Pudhari Photo)
Published on
Updated on

वाशिम : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेरून गर्दीचा फायदा घेत त्यांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. शशिकांत विठ्ठल इधाटे (वय ३१, रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली १४.७७० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, किंमत सुमारे २ लाख २५ हजार रुपये, जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिवाजीराव पवार (वय ५०, रा. पाडेगाव, ता. खंडाळा, जि. सातारा, सध्या रा. नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगर) हे ७ सप्टेंबर रोजी कारंजा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी कारंजा बसस्थानकावर बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरली. याप्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते. बसमध्ये प्रवाशांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारंजा शहर परिसरात तपास सुरू केला. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी या गुन्ह्यातील संशयित आरोपी अहिल्यानगर येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुधाकर आढे यांनी पथक तयार करून ते तातडीने अहिल्यानगरकडे रवाना केले.

पोलिस पथकाने अहिल्यानगर बसस्थानक परिसरात शोध घेतला असता संशयित आरोपी बसमधून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. पोलिस आल्याची चाहूल लागताच त्याने बसमध्ये बसून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तत्काळ ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शशिकांत विठ्ठल इधाटे असल्याचे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून चोरीस गेलेली १४.७७० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन मिळून आली. पोलिसांनी आरोपीला वाशिम येथे आणून पुढील तपासासाठी कारंजा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, पुढील तपास कारंजा शहर पोलिस करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आढे, सपोनि योगेश धोत्रे तसेच पोलिस हवालदार सुरज खडके, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, गजानन झगरे, पोलिस अंमलदार अमोल इरतकर, संतोष वाघ आणि चालक सुनील तायडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news