वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १० चोरीच्या ऑटो रिक्षा जप्त केल्या  Pudhari
वाशिम

Washim Rickshaw Theft | बनावट नंबरप्लेटचा बनाव उघड; चोरीच्या १० ऑटो रिक्षा जप्त

रिक्षाचालकाच्या मोबाईलवर आलेल्या अनोळखी ई-चलानच्या मेसेजमुळे बनावट नंबरप्लेटचा वापर करून चोरीच्या ऑटो रिक्षा चालविण्याच्या प्रकाराचा पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

Auto Rickshaw Theft Washim

वाशिम : एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर आलेल्या अनोळखी ई-चलानच्या मेसेजमुळे बनावट नंबरप्लेटचा वापर करून चोरीच्या ऑटो रिक्षा चालविण्याच्या प्रकाराचा पर्दाफाश झाला. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) केलेल्या कारवाईत तब्बल १० चोरीच्या ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ८ लाख ६० हजार रुपये आहे. या प्रकरणी दादाराव राजाराम घुगे (वय ५२, रा. शुक्रवारी पेठ, इनामदारपुरा, वाशिम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ई-चलानच्या मेसेजने उलगडला प्रकार

हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम आणि मालेगाव परिसरातील ई-चलानचा मेसेज आला. मात्र, संबंधित रिक्षा त्याच्याकडे सुरक्षित असताना त्याच्या वाहन क्रमांकावर वाशिममध्ये दंड कसा आकारला गेला, असा प्रश्न त्याला पडला. त्याने तत्काळ ही बाब वाशिम LCB मधील पोलीस अंमलदार विठ्ठल महाले यांच्या निदर्शनास आणून दिली.

महाले यांनी संबंधित वाहनाचा फोटो मागवून तपास केला. त्यावेळी ई-चलानमध्ये दिसणारी रिक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्या रिक्षेवर हिंगोली येथील मूळ रिक्षामालकाच्या वाहनाचा नंबर वापरण्यात आला होता.

दुसऱ्या घटनेमुळे संशय बळावला

दरम्यान, वाशिम तालुक्यातील आणखी एका व्यक्तीला अशाच प्रकारचा ई-चलानचा मेसेज प्राप्त झाला. पोलिसांनी त्याला संबंधित रिक्षेचा फोटो दाखविल्यावर त्यानेही ही रिक्षा आपली नसल्याचे सांगितले. मात्र, तिच्यावर लावण्यात आलेला क्रमांक हा त्याच्या जुन्या ऑटो रिक्षेचा असल्याचे त्याने स्पष्ट केले.

दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या वाहन क्रमांकांचा एकाच पद्धतीने गैरवापर झाल्याचे समोर आल्याने LCB पथकाचा संशय बळावला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासाची दिशा वाशिम शहरातील शुक्रवारी पेठ, इनामदारपुरा येथील दादाराव घुगे याच्याकडे वळली.

घराजवळ १० ते १२ ऑटो रिक्षा आढळल्या

LCB पथकाने घुगे याच्या घरावर छापा टाकला असता परिसरात तब्बल १० ते १२ ऑटो रिक्षा उभ्या असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या रिक्षांच्या कागदपत्रांची चौकशी केली. कागदपत्रे आणि रिक्षांचे चेसिस क्रमांक तपासल्यानंतर त्यांच्यात तफावत आढळून आली.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर घुगे याने चोरीच्या ऑटो रिक्षांबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्यातील तसेच परराज्यातील चोरीच्या ऑटो रिक्षा खरेदी करून त्यावर इतर वाहनांचे बनावट क्रमांक टाकले जात होते. त्यानंतर या रिक्षा वाशिम शहरात दररोज सुमारे २५० रुपये भाड्याने चालविण्यासाठी दिल्या जात असल्याचे तपासात समोर आले.

८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी १० चोरीच्या ऑटो रिक्षा जप्त केल्या असून, त्यांची किंमत ८ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. आरोपी दादाराव घुगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध BNS कलम ३१८(४) आणि ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LCB पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार आणि LCB पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, पोलीस अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ई-चलानच्या एका मेसेजमधून मिळालेल्या धाग्याचा पाठपुरावा करत LCB पथकाने बनावट नंबरप्लेटच्या माध्यमातून चोरीच्या रिक्षा चालविण्याचा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे आणि तपासातील कौशल्यामुळे चोरीच्या रिक्षांच्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT